नमस्कार,


मी तुषार भोसले,कृषी पदवीधर, शेतकरी पुत्र.


होय मी जगाचा पोशिंदा शेतकरी बोलतोय..


यामध्ये "मी" हा शेतकरी, कास्तकार, सामान्य माणूस या अर्थाने घ्यावे.


शेतकरी म्हणून माझी आजची अवस्था, माझ्या समोर असणारी उद्याची आव्हाने, माझा भुकाळातील संघर्ष ते सन्मानाने भविष्याची वाटचाल. 
            शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मग जगाचा पोशिंदा आज कोणत्या अवस्थेत आहे तर ना मजबूत घर, ना अपेक्षित आरोग्य सुविधा,ना आत्याधुनिक शिक्षण, ना स्वप्न बघण्याची उम्मेद, ना सन्मानाच जीवन,ना आर्थिक स्थिरता, आशा कोणत्याच गोष्टी माझ्या आयुष्यात दिसत नाहीत. कधी ऐकलंय का मी एक शेतकरी म्हणून पिकनिक किंवा सुट्टीवर गेलो आहे, माझ्या आयुष्यात फक्त वर्षाकाठी देव दर्शनच का?माझ्या आज्ञानामुळे आणि देव भोळेपणामुळे माझ्या मनामध्ये आजून भीती घातली जाणार का? मला फक्त जात, धर्म, पंथ यातच अडकवले जाणार का? फक्त नवस बोलायला आणि खोट्या सामाजिक दबावामुळे कर्ज काडुन कार्यक्रम करायलाच आपण सांगणार का? मला आर्थिक नियोजन, प्रत्येक गोष्टीमागचे विज्ञान कधीच नाही समजू देणार का? आयुष्य का जगायचं,कोणासाठी जगायचं, आयुष्य एकदाच आहे, म्हणून भरभरून जगू न देता पुनर्जन्म सारख्या खोट्या आणि भाबड्या संकल्पना माझ्या मनात कोंबायच्या हे योग्य आहे का? आयुष्यभर कष्ट एके कष्ट पण त्या कष्टाला योग्य मोबदला सुद्धा नाही हे अमानवीय नाही का? प्रत्येक निवडणुकी आगोदर मला अविश्वासनिय, कल्पनिक स्वप्न दाखवले जाणार का? माझ्याच हक्काचे पैसे, योजना, अनुदान, मिळवण्यासाठी मलाच लाचार केले जाणार का? आशा असंख्य का???? ची उत्तरे आपण या ब्लॉग लेखनातून शोधणार आहोत. 

            त्याच बरोबर शेतकऱ्याचे हक्क, योजना, आजच्या युगातील शेतकरी आणि त्याच्या समोरील असंख्य आव्हाने मग ती अवकाळी पाऊस, वातावरण बदल, कुटुंब नियोजन, जमिनीची ढासळत जाणारी सुपीकता, पाण्याची कमतरता, कीड आणि रोग यांच बदलते स्वरूप, या आणि अशा सर्व आव्हानांना खंबीर पणे सामोरे जाण्यासाठी काय उपाय योजना करणे आवश्यक आहे, त्या करत असताना भूमिपुत्र हाच केंद्रस्थानी राहील याची काळजी घेऊन आपण सर्व शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस, आणि वाचक यांसाठी आजपासून हा वैचारिक प्रवास सुरु करत आहोत.

            आज आपण बघत असाल तर बहुतांशी शेतकरी पुत्र शिक्षित आहेत, म्हणजे सज्ञान आहेत. आपल्या आडानी बापाच्या आज्ञानाचा न्यूनगंड न बाळगता त्यांना कश्या प्रकारे तंत्रज्ञानाशी जोडता येईल याचा प्रयत्न करत असालच. शेतीमधे प्रयोगशील असालच.आपण आपल्या मागच्या पिढीच्या एक पाऊल पुढे राहून आपल्या हक्कासाठी जागृत राहावे. भूमिपुत्र म्हणून आपल्या कामाला एक सन्मान मिळावा, दर्जा प्राप्त ह्यावा, याच बरोबर कृषी संलग्न व्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग, यासंबंधी यशोगाथा, अशा सर्व बाबी वर प्रकाश टाकणे काळाची गरज आहे.


"वाचनाने विचार निर्माण होतात आणि विचाराने कृती घडते, कृतीतून बदल नक्की होतो "


आपण वाचाल, आत्मसात कराल आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवाल अशी आशा आहे .
श्री. तुषार भोसले (शेतकरी पुत्र)

(लेखक कृषी पदवीधर, कृषी आणि सामाजिक क्षेत्राचे अभ्यासक आहेत)