पिक उत्पादन मधील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे जमीन. पूर्वी सेंद्रिय पदार्थ जिमिनित टाकण्याचे प्रमाण जास्त होते. साहजिकच त्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास मदत होत होती. अत्रधान्यांची वाढती गरज, त्यासाठी जमिनीतून अधिकाधिक पिके घेण्याकडे कल, संकरित वाणांचा वापर आणि रासायनिक खतांचा प्रचंड मारा, आंतरपीक, दुबार पीक घेण्याची पद्धत यामुळे जमिनीचा पोत घटत असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात आढळले आहे.

१९९२ पर्यंत रासायनिक खतांच्या किमती कमी होत्या. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली होती. त्यानंतर रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. जमिनीची अन्यद्रव्यांची गरज सुद्धा वाढली. अशा परिस्थितीत कमी किमतीतील खतांचा शेतकऱ्यांकडून वापर सुरू झाला. अलीकडे रासायनिक खताच्या मात्रा देऊनही उत्पादन वाढीस मर्यादा आल्या, त्यामुळे पाणथळ क्षेत्रांसह काही भागात जमिनीवर क्षाराचे पट्टे दिसू लागलेत. ही पिकांसाठी मोठी धोक्याची घंटा आहे.

जमीन ही नैसर्गिकरीत्या नैसर्गिक सामुग्रीवर, नैसर्गिक शक्तीच्या प्रक्रियेत घडलेली आहे. जमिनीला विविध प्रकारचे रंग, रूप, घडण, खोली व प्रक्रिया असतात. म्हणून खड़क हे जमिनीचे सर्वात मोठे घटक असतात. जमिनीत खनिज, सेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा, सूक्ष्म जीवजंतु हे घटक कमी-जास्त प्रमाणात असतात. यावरच जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता अवलंबून असते. जमिनीत उत्तम पीक वाढीसाठी १६ मूलद्रव्ये आवश्यक आहेत, हे प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. नैसर्गिकरीत्या मूलद्रव्यांची कमतरता असेल, तर त्याचा पुरवठा कृत्रिमरीत्या निरनिराळ्या खतांमधून करणे आवश्यक आहे; पण या खतांचा मारा वाढल्याने जमिनीचा पोत बिघडत आहे.

पिकांच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, लोह, मॅगेनीज, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन, कोबाल्ट या मूलद्रव्यांचा मोठा वाटा आहे. पीक वाढीसाठी आवश्यक १६ मूलद्रव्यांपैकी १३ मूलद्रव्यांचा पुरवठा हा जमिनीतून होतो. उर्वरित कर्ब, हायड्रोजन व प्राणवायू हे तीन घटक हवेतून अथवा पाण्यातून मिळतात. प्रत्येक पिकाची मूलद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. भात, ज्वारी, मका, ऊस, सूर्यफूल यांसारख्या पिकांना नत्र, स्फुरद, पालाश या मूलद्रव्यांची इतर पिकांच्या तुलनेत जास्त गरज असते. तूर, मूग, उडीद, चवळी, भुईमूग या पिकांना नत्राचे प्रमाण कमी लागते; परंतु स्फुरद मात्र नत्रापेक्षा जास्त लागते. शर्करायुक्त पिकांना म्हणजेच केळी, ऊस, रताळी, बीट, डाळिंब, चिकू या. पिकांना पालाश मूलद्रव्यांची अधिक गरज असते.

अलीकडे कृषी विभागाच्या जमीन सुपिकता पाहणीत जमिनीतील नत्राचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. स्फुरद अत्यंत भरपूर प्रमाणात, तर पालाश मध्यम स्वरूपात आहे. लोह, बोरॉन, मंगल, सल्फरची जमिनीत कमतरता असून, खतांच्या वापरामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. काही ठिकाणी जमिनीत जस्त चे प्रमाण पुरेसे आहे, तर काही ठिकाणी कमतरता आहे.

माती परीक्षणाचे फायदे

👉जमिनीतील घटकाचे प्रमाण, तसेच दोष समजतात.

👉जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.

👉जमीन सुधारण्यासाठी नियोजन करणे सोपे जाते.

👉खताची संतुलित मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ होते. 

👉आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत,

👉जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.

👉जमिनीची सुपिकता आजमावून जमिनीचे प्रकार निश्चित करता येतात.


©Sakal