'आयएमडी'च्या निधीस कात्री; महाराष्ट्रातील ११ केंद्रांचा समावेश

हवामान खात्याकडून निधी बंद

देशभरात उभारण्यात आलेल्या जिल्हास्तरावरील १९९ युनिटकरिता भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) निधी दिला जात होता. आता हा निधी देण्याबाबत 'आयएमडी'ने असमर्थता व्यक्त केली आहे. आयएमडीच्या निधीला केंद्रीय अर्थमंत्रालयाने कात्री लावल्याने हा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. परंतु शेतकरी हिताच्या उपक्रमांसाठीच निधीत काटछाट का, असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे.

अशी होती कार्यपद्धती

भारतीय हवामान खात्याकडून संबंधित 'केव्हीके'ला जिल्हास्तरावरील हवामानाचा अंदाज कळविण्यात येत होता. त्याचे विश्लेषण करून त्याआधारे कृषी विषय तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना सल्ला (अॅडव्हायसरी) दिला जात होता. त्यामध्ये पशुपालकांनी काय काळजी घ्यावी, पावसात खंड पडल्यास कोणते पीक घ्यावे, काय फवारणी करावी, कोणते खत द्यावे यासह इतर बाबींचा त्यामध्ये समावेश होता. आयएमडीच्या संकेतस्थळावर हा सल्ला अपलोड करणे आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करणे अशी कामे या केंद्रांद्वारे होत होती. परंतु अचानक ही केंद्रे बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान सोसावे लागणार आहे.

वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभाग (आयएमडी) व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने जिल्हास्तरावर हवामान सल्ला मिळत असे. त्याआधारे पीक व्यवस्थापन करता यावे व त्यातून पीक नुकसान कमी व्हावे या उद्देशातून देशभरात १९९, तर महाराष्ट्रात ११ केंद्रे उघडण्यात आली होती. मात्र निधी उपलब्धतेची अडचण असल्याचे सांगत अवघ्या पाच वर्षांतच हा शेतकरी हिताचा उपक्रम गुंडाळण्यात आल्याने केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.


जागतिकस्तरावर हवामानातील बदल हे नवे आव्हान ठरले आहे. त्यामुळेच हवामानाचा परिणाम सोसावा लागणाऱ्या घटकांना वेळीच हवामानातील बदलाची माहिती व्हावी याकरिता सर्वस्तरांवर प्रयत्न होत आहेत. भारतातही हवामानात सर्वाधिक तफावत असलेल्या जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला. त्याआधारे प्रायोगिक तत्त्वावर १९९ ठिकाणी जिल्हा कृषी हवामान केंद्र (ॲग्रोमेट युनिट) उभारण्यात आले.

महाराष्ट्रात पालघर, तुळजापूर (धाराशिव), छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदूरबार, सीआयसीआर (नागपूर), दुर्गापूर (अमरावती), गडचिरोली, साकोली (भंडारा), करडा (वाशीम), बुलडाणा अशा ११ ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली होती. मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस हवामान आधारित सल्ला दिला जात होता. हवामानात अचानक बदल झाल्यास त्याबाबतही शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे माहिती त्या त्या वेळी दिली जात होती. याकरिता एमएससी कृषी हवामानशास्त्र अशी पात्रता असलेल्या विषय तज्ज्ञ कृषी हवामान शास्त्र, तसेच बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण कृषी हवामान निरीक्षक अशा दोघांची नियुक्ती केव्हीकेस्तरावर करण्यात आली होती. त्यांना वेतन रचना निश्चित करून पगार दिला जात होता. गेल्या वर्षी त्यांना पत्र दिले, त्यात मार्च २०२६ पर्यंत सेवा कालावधी वाढविण्याचे नमूद आहे. असे असताना बुधवारी (ता. १७) अचानक पाठविण्यात आलेल्या पत्रात २९ फेब्रुवारीपासून हे केंद्र बंद करून या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीबाबत कळविण्यात आले. भारतीय हवामान खाते व 'अटारी'कडून तसे पत्र संबंधित 'केव्हीके'ला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


सौ. ॲग्रोवन